Tuesday, August 11, 2015

कोल्हापुरी मिसळ - एक अनुभव!

बैचलर असताना आम्ही सर्व रूममेट्स  पुण्याहून कोल्हापूरला फिरायला गेलो. रात्री पांढऱ्या-तांबड्या रस्यावर चांगलाच ताव मारला आणी मस्त गप्पा गोंधळ करत कधी झोपलो ते आठवत नाही. सकाळी उठल्यावर चहापान वगैरे उरकून झाल्यावर नाश्ता काय करायचा याविषयी एकमत होईना. आम्हा सगळ्या मंडळीना कोल्हापुरी मिसळबद्दल प्रचंड उत्सुकता होतीच त्यामुळे ती कुठे चांगली मिळते ते शोधून काढले.  महाराष्ट्रात कोल्हापुरी म्हणजे तिखट, लाल भडक मिसळ, अशी समजूत आहे. साहजिकच आम्हीही तेच समजून "फडतरे मिसळ" या कोल्हापुरातील मिसळकरता प्रसिद्ध अशा ठिकाणी रांगेत उभे राहून मिसळ समोर येण्याची वाट पाहत बसलो. जेव्हा मिसळ आली तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो कारण ती तांबडी तरीदार तर मुळीच नव्हती आणी तिखटहि नव्हती. माझ्या इतर मित्रांना ती अजिबात आवडली नाही. मला बेडेकरांची मिसळ खाण्याची "सवय" असल्याने मी ती खाल्ली. बाहेर आल्यावर आम्ही एका कोल्हापुरी माणसास याबद्दल विचारले असता तो म्हणाला कोल्हापुरी म्हणजे तिखट हा एक गैरसमज आहे कोल्हापुरी मसाल्याची एक वेगळी अशी चव आहे. ते ऐकून आम्ही मनोमन म्हणालो आपली नाशिकची मिसळच लय भारी बुवा!

No comments:

Post a Comment